Home Breaking News खासगी प्रवासी बस पलटून अपघात

खासगी प्रवासी बस पलटून अपघात

514

तिघांची प्रकृती गंभीर

लोकवृत्त न्यूज
धानोरा, दि. २४ : धानोरा–मुरूमगाव मार्गावरील वडगावजवळ आज (२४) रविवारी दुपारी खासगी प्रवासी बस पलटून झालेल्या भीषण अपघातात १८ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातील दल्ली येथून गडचिरोलीकडे येणारी खासगी ट्रॅव्हल्स बस रविवारी सकाळी प्रवाशांना घेऊन निघाली होती. बसमध्ये चालक व वाहकासह एकूण ३६ प्रवासी होते. दुपारी सुमारे १२.४५ वाजताच्या सुमारास बस वडगावजवळ पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली.
अपघातानंतर बसमधील प्रवाशांचा आरडाओरडा सुरू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन तसेच काही पदाधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
या अपघातात नीलकंठ वाडके (५८, मारोडा), चांदणी रामटेके (२३, तोरगाव) आणि चालक रवी चावरे (३५, दल्ली, छत्तीसगड) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे रेफर करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी अपघात झाला तो रस्ता खराब असल्याने बसचा वेग कमी होता. तसेच बस रस्त्यालगत असलेल्या झाडाला अडकल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे बोलले जात आहे. अन्यथा अपघात अधिक भीषण ठरला असता.
काही प्रवाशांनी बस चालकाने मद्यप्राशन केल्याचा आरोप केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Don`t copy text!