• जंगलात पुरून ठेवले होते साहित्य
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :- गडचिरोली जिल्ह्यात माओवादी कारवायांना मोठा धक्का देत पोलिसांनी जंगल परिसरात गुप्तपणे लपवून ठेवलेला माओवादी शस्त्रनिर्मिती कारखाना आणि विविध साहित्य शोधून काढत ते घटनास्थळीच नष्ट केले. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, माओवादी सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्यासाठी विविध प्रकारची शस्त्रे, स्फोटक साहित्य आणि अन्य उपकरणे जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवत असत. नक्षल सप्ताह, निवडणुका आणि इतर संवेदनशील काळात या साहित्याचा वापर सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी कारवायांवर प्रभावी नियंत्रण मिळवत असताना पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. “ऑपरेशन अंतिम प्रहार” अंतर्गत 16 मे 2026 रोजी आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या सखोल चौकशीतून पोमकें-बिनागुंडा परिसरातील जंगलात शस्त्रनिर्मिती आणि इतर साहित्य लपवून ठेवल्याची माहिती उघड झाली होती.
या माहितीच्या आधारे 21 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक गडचिरोली, प्राणहिता युनिटच्या संयुक्त सहा तुकड्या तसेच बीडीडीएसच्या दोन पथकांना शोधमोहीमेसाठी रवाना करण्यात आले.
22 मे 2026 रोजी पोमकें-बिनागुंडा परिसराच्या उत्तरेकडील जंगलात विशेष अभियान पथकांनी घेराबंदी करून कसून शोधमोहीम राबविली. यावेळी जवानांना जंगलात लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. यामध्ये लेथ मशीन, बीजीएल पाईप्स, 12 बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, ग्राइंडिंग व ड्रिलिंग मशीन, जीग सॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल तसेच 20 फुटी फुटबॉल पाईप आदी साहित्य हस्तगत करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच सर्व साहित्य सुरक्षितपणे नष्ट करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता आणि बीडीडीएसच्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली. या उल्लेखनीय कारवाईबद्दल सहभागी जवानांचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.














