– आरोग्य विभागाची धडक कारवाई
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ता. १५ : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर सक्रिय असल्याचे उघडकीस आले असून, आरोग्य विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष समितीच्या तपासणीत तब्बल ३१ बोगस डॉक्टर बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दहिफळे यांनी दिली.
तालुक्यात अनेक जण बिना वैद्यकीय डिग्री आणि प्रमाणपत्र रुग्णांवर उपचार करत होते. त्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक निरपराध नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत विशेष तपासणी समितीने धानोरा, चातगाव, गोडलवाही, पयडी, पेंढरी, ढोरगट्टा, कारवाफा, खुटगाव, सुरसुंडी, मुरुम, खांबाळा, सावरगाव, येरकड, निमगाव, रांगी, मोहली, गुजनवाडी आणि जपतलाई या गावांमध्ये बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याचे उघड केले.
समितीने बोगस डॉक्टरांना नोटिसा बजावल्या असून, अनेकांनी आपली वैद्यकीय पात्रता नाकारली आहे. काही जणांकडून जबाब लिहून घेतला गेला आहे. त्यामुळे लवकरच कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाच्या धडक मोहिमेमुळे बोगस डॉक्टरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #gadachirolipolice @Gadchirolipolice #crime #naxal #doctor #arogya vibhag )













