कोरची पोलीसांची मोठी कारवाई : अवैध दारूसाठा व वाहनासह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

159

कोरची पोलीसांची मोठी कारवाई : अवैध दारूसाठा व वाहनासह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१२ :-गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध दारू वाहतूक व विक्री सुरूच असून, यावर लगाम घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने धडक कारवाया केल्या जात आहेत. 12 एप्रिल रोजी कोरची पोलिसांनी अवैधरीत्या दारू वाहतूक करणाऱ्या बोलेरो वाहनावर कारवाई करून एकूण 16 लाख 1 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

देवरी ते कोरची रस्त्यावरून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोरची पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शैलेन्द्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक मौजा पकनाभट्टीजवळ सापळा रचून थांबले. सकाळी 6.40 वाजता एक पांढऱ्या रंगाची बोलेरो संशयास्पद हालचाल करताना आढळून आली. पोलिसांनी वाहन अडवल्यानंतर चालकाने आपले नाव धम्मत गुणवंत बोरकर (रा. गिधाडी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) असे सांगितले.

वाहनाची तपासणी केली असता, मुरमुऱ्यांच्या पोत्यांखाली लपवलेले मोठ्या प्रमाणात दारूचे बॉक्स सापडले. त्यामध्ये गोवा व्हिस्की, मॅगडोवेल्स नं. 1, किंगफिशर बिअर व ऑफिसर चॉईस यांचा समावेश होता. एकूण दारूचा अंदाजे किंमत 9,97,200 रुपये इतकी असून, वापरलेले बोलेरो वाहन व अन्य साहित्यासह एकूण जप्तीचा आकडा 16,01,200 रुपये इतका आहे.

या प्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी धम्मत बोरकर याला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई कोरची पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त प्रयत्नांतून पार पडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण बुंदे करत आहेत.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Gadchirolipolice @Gadchirolipolice)