गडचिरोली : भीषण अपघातातील त्या वरिष्ठ लिपिकाचा अखेर मृत्यू

1071

गडचिरोली : भीषण अपघातातील त्या वरिष्ठ लिपिकाचा अखेर मृत्यू

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ता. 29 एप्रिल :– शहरातील जिल्हा सत्र न्यायालय चौकात मंगळवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विलास शंकर वासनिक (वय ५७, रा. मुरखळा) यांचा अखेर दुपारच्या सुमारास मृत्यू झाला. नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने पोलीस विभागात आणि गडचिरोली शहरात शोककळा पसरली आहे.
मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता जिल्हा सत्र न्यायालय चौकात MH-34 M-8970 क्रमांकाच्या भरधाव हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या भीषण धडकेत वासनिक यांचा डावा पाय पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. अपघातानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने हेलिकॉप्टरद्वारे नागपूरला हलवण्यात आले होते.
प्रभारी पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तात्काळ धाव घेऊन उपचाराची तजवीज केली होती. त्यांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकीची भावना विशेष चर्चेत राहिली. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही वासनिक यांचे प्राण वाचवता आले नाहीत.
दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या न्यायालय चौकात ना सिग्नल आहे, ना गतिरोधक, ना वाहतूक नियंत्रण. वारंवार अपघात घडूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता लोकांचा संयम सुटला आहे. “घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यात येतात, पण अशा घटना टाळण्यासाठी वेळीच कारवाई का होत नाही?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या चौकात कायमस्वरूपी ट्राफिक सिग्नल, गतिरोधक आणि वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्त ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Gadchirolipolice @gadachirolipolice #accident)