चारगावात काकावर तलवारीने हल्ला ; शेतीच्या वादातून पुतण्याचा थरारक हल्ला, काका गंभीर जखमी
लोकवृत्त न्यूज
सावली, २ जून :- नुकतेच सावली तालुक्यातील केरोडा येथे खूनाची घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा तालुक्यात खळबळजनक हल्ला घडला आहे. चारगाव येथे काका-पुतण्यात झालेल्या वादातून पुतण्याने काकावर तलवारीने हल्ला केला असून, या हल्ल्यात नरेश कृष्णा आडे (वय २७) गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ही घटना रविवार दि. १ जून रोजी दुपारी चारगाव येथे घडली. जखमी नरेश आडे हे एका लहान मुलासोबत दुचाकीने डिझेल कॅन आणण्यासाठी निघाले असताना, चारगाव नदीजवळ पुतणा कुणाल अनिल आडे (वय २३) याने आधीपासून दबा धरून थेट तलवारीने डोक्यावर वार केला.
हल्ल्यावेळी दुचाकीवर असलेला लहान मुलगा देखील खाली पडला. घाबरलेला मुलगा आरडाओरड करताच, परिसरात पुलाचे काम करणाऱ्या मजुरांनी तत्काळ धाव घेतली. मजुरांना पाहताच आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले.
सावली पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीस काही तासांत अटक केली आहे. शेतीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून, आरोपी यापूर्वी देखील गावात काही जणांना धमक्या देत असल्याचे सांगण्यात येते.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 109(1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
तालुक्यात तणावपूर्ण वातावरण
केरोडा खून प्रकरणानंतर अवघ्या काही दिवसांतच चारगावात ही हिंसक घटना घडल्याने तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @Chandrapur news #savli #crime )

