लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत युवक ठार : अपघातानंतर पुरावे पुसण्याचा प्रयत्न ?
लोकवृत्त न्यूज
एटापल्ली :- तालुक्यातील परसलगोंदी गावाजवळ काल (१५ जून २०२५) रात्री सुमारास घडलेल्या भीषण अपघातात उमेश मंगु लेकामी (वय २२, रा. बुर्गी-कांदोळी) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. उमेश हा सुरजागड येथून आपल्या गावी परतत असताना, लोहखनिज वाहतूक करणाऱ्या लॉयड मेटल कंपनीच्या ट्रकने त्याच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की उमेशने घटनास्थळीच प्राण सोडले.
अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदत केली, मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच उमेशचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे अपघात घडल्यानंतर ट्रक चालक व सहकाऱ्यांनी घटनास्थळ स्वच्छ करत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर माहिती समोर येत आहे.
घटनास्थळी ना ट्रक दिसला ना बाईक — हे वाहन कुठे गायब झाले? या गंभीर प्रश्नामुळे संपूर्ण घटनेभोवती संशयाचे गडद सावट पसरले आहे. पोलिसांसाठी ही एक गुंतागुंतीची केस ठरत आहे. ट्रकचा क्रमांक, अपघाताची वेळ, आणि साक्षीदार यांचा अभाव तपासाला अडथळा ठरत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून युवक संघटना व ग्रामस्थांनी या अपघाताची सखोल चौकशी करून संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुरजागड परिसरातील बेधुंद खनिज वाहतूक नागरिकांच्या जीवावर उठली असल्याची प्रतिक्रिया लोकांतून व्यक्त होत आहे.
पोलीस प्रशासन तपासात व्यस्त असून ट्रक व चालकाचा शोध घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे उमेशच्या मृत्यूनंतर त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
या अपघाताची सखोल चौकशी होऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी आता जनतेकडून केली जात आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #crime @gadachiroli police #accident )

