हरिद्वार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत गडचिरोलीच्या ‘तीन तेजस्विनी’ : जिल्ह्याचा अभिमान द्विगुणित

223

हरिद्वार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत गडचिरोलीच्या ‘तीन तेजस्विनी’ : जिल्ह्याचा अभिमान द्विगुणित

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :– जिल्ह्यातील क्रीडाजगतातील एक उज्वल पर्व ठरावी अशी आनंददायक बातमी! महाराणा प्रताप स्पोर्ट्स असोसिएशन, गडचिरोलीच्या तीन झुंजार कबड्डीपटूंनी राष्ट्रीय पातळीवर आपली योग्यता सिद्ध करत कबड्डी क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
उत्तराखंडातील हरिद्वार येथे २०२५ मध्ये होणाऱ्या १८ वर्षांखालील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी कु. प्रगती गेडाम आणि कु. विद्या राणा यांची निवड झाली आहे. तर वरिष्ठ राष्ट्रीय व वरिष्ठ फेडरेशन कबड्डी स्पर्धेसाठी कु. तुप्ती पागे हिला संधी प्राप्त झाली आहे. या निवडीनं गडचिरोली जिल्ह्याचा गौरव द्विगुणित झाला असून, जिल्ह्यातील महिला क्रीडापटूंसाठी ही एक प्रेरणादायक घटना ठरली आहे.
या तीन तेजस्विनींच्या यशाबद्दल अमेचर कबड्डी असोसिएशन, गडचिरोलीचे सचिव राजेंद्र गार्गीलवार, प्रशिक्षक आशिष बिस्वास, प्रशांत कोटगले, प्रतीक बोगा व लक्ष्मण कोडापे यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना नवे बळ मिळाले असून, गडचिरोलीचा झेंडा राष्ट्रीय क्रीडांगणावर अभिमानाने फडकताना दिसत आहे.