“हरण मारलं… मटण शिजवलं… खाताना रंगेहाथ पकडलं!” : अहेरीत एफडीसीएमच्या कर्मचाऱ्यांकडून वन्यजीव शिकार

368

– पाच ताब्यात

लोकवृत्त न्यूज
अहेरी (श.प्र.) :– ज्यांच्या हाती जंगलाचं रक्षण, त्यांच्याच हातून वन्यजीवांचा संहार! असा धक्कादायक प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात उघडकीस आला आहे. आलापल्ली वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) काही कर्मचाऱ्यांनीच हरणाची बेकायदेशीर शिकार करून मटण शिजवून खाताना वन विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बुधवार (दि. 1 जुलै) च्या रात्री हा प्रकार घडला. आलापल्ली वनविकास महामंडळाच्या हद्दीत काही कर्मचाऱ्यांनी जंगलातून हरणाची शिकार करून रात्री मटण शिजवण्याचा बेत आखला. या संदर्भात माहिती मिळताच नुकताच पदभार स्वीकारलेल्या उपवनसंरक्षक दीपाली तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने धाड टाकून दोन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी ताब्यात घेतले.
चौकशीत या दोघांनी हरणाचे मटण खाल्ल्याची कबुली दिली असून, आणखी काही सहकाऱ्यांची नावे उघड केली. पुढील तपासात आणखी तीन जणांचा सहभाग निष्पन्न झाला. गुरुवारी (दि. 10 जुलै) पर्यंत एकूण पाच जणांना ताब्यात घेऊन सखोल चौकशीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वनविभागात खळबळ – जनतेत संताप

वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी असलेल्या एफडीसीएममधीलच कर्मचाऱ्यांकडून अशी गंभीर शिकार झाल्याने वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. “जंगल रक्षकच शिकारी बनले!” या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

मोठे मासे गळाला लागणार?

या प्रकरणात फक्त पाचच नव्हे, तर आणखी काही कर्मचारी सहभागी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. आरोपी कर्मचाऱ्यांकडून गुन्हा कनिष्ठ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या ‘शिकारी प्रकरणा’त आणखी कोणते मोठे मासे अडकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #crime @gadachiroli police #वन विभाग )