खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जुलै २०२५ रोजी गडचिरोलीत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांना लाभ होईल, अशा विविध उपक्रमांनी गडचिरोली शहरात उत्सवाचे स्वरूप निर्माण झाले आहे.
या विशेष दिनानिमित्त शहरातील विविध भागांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व खाऊ वाटप, रुग्णांना फळे व अन्नदान, तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तक वाटप आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांचा उद्देश गरजू घटकांना मदत करणे, शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे हा आहे. डॉ. किरसान यांच्या प्रेरणेतूनच हे उपक्रम राबवले जात असून, त्यामध्ये विविध संघटना, काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपरिवार उत्साहाने सहभागी झाले आहेत.
या उपक्रमांमध्ये गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

