डॉ. बाहुबली शहांच्या आमरण उपोषणाला गडचिरोलीतील होमिओपॅथी डॉक्टरांचा ठाम पाठिंबा

348

डॉ. बाहुबली शहांच्या आमरण उपोषणाला गडचिरोलीतील होमिओपॅथी डॉक्टरांचा ठाम पाठिंबा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, १४ जुलै :- महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक आणि ज्येष्ठ होमिओपॅथिक डॉक्टर डॉ. बाहुबली शहा यांनी १६ जुलैपासून मुंबईतील आझाद मैदानावर ‘होमिओपॅथी स्वाभिमान आंदोलन’ अंतर्गत आमरण उपोषण पुकारले आहे. या आंदोलनाला गडचिरोली जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी ठाम पाठिंबा दर्शवला असून सोमवारी इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.

डॉ. शहा यांच्या म्हणण्यानुसार, सीसीएमपी (सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी) उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (MMC) नोंदणीला इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) विरोध करत आहे. त्यांनी खोट्या आणि अर्धसत्य माहितीच्या आधारे शासनावर दबाव टाकल्याचा आरोपही डॉ. शहा यांनी केला. या विरोधामुळे हजारो सीसीएमपी डॉक्टरांच्या आत्मसन्मानाला धक्का बसल्याचे ते म्हणाले.

सीसीएमपी अभ्यासक्रम महाराष्ट्र विधानमंडळाने मंजूर केलेल्या कायद्यानुसार असून, त्याला शासनाची अधिकृत मान्यता आहे. २०१७ पासून हजारो डॉक्टरांनी हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला असून ते आधुनिक औषधोपचारासाठी सक्षम असल्याचा दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला. आयएमएने अभ्यासक्रमविरोधी केलेले न्यायालयीन प्रयत्न निष्फळ ठरले असूनही एमएमसी सीसीएमपी डॉक्टरांची नोंदणी करत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

डॉ. शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदनाद्वारे या आंदोलनाची माहिती दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील डॉक्टरांनी यास एकमुखी पाठिंबा दिला असून ‘ही लढाई आता केवळ हक्कांची नाही, तर होमिओपॅथीच्या अस्मितेची आहे’ अशा शब्दांत तीव्र भावना व्यक्त केल्या.
( #LOKVRUTTNEWS #lokvrutt.com @lokvruttnews #gadachirolinews #Maharashtra #MMC #IMA @Dr. )