कुरखेडा : भिषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू ; ट्रकखाली येत मृतदेह छिन्नविछिन्न

356

– जिल्ह्यात अपघातांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही

लोकवृत्त न्यूज
कुरखेडा :- गडचिरोली जिल्ह्यातील कढोली- गांगोली मुख्य मार्गावर मंगळवारी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला. ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जोरदार होती की, मृतदेह अक्षरशः छिन्नविछिन्न झाले. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये प्रज्वल प्रल्हाद अलाम (वय २५) व वैष्णव गुणाजी उईके (वय २२, दोघेही रा. नरचूली, ता. आरमोरी) यांचा समावेश आहे. हे दोघे दुचाकी (क्र. MH 33 AG 9256) वरून नरचूली येथून आपल्या बहिणीला भेटण्यासाठी पळसगाव (ता. कुरखेडा) येथे जात होते. दरम्यान, दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास गांगोलीजवळील खवल्या देवस्थानाजवळ समोरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या ट्रक (क्र. CG 04 NQ 8317) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
धडकेनंतर दोघे तरुण थेट ट्रकखाली सापडले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. अपघात इतका भयावह होता की, दोघांचे मृतदेह क्षणात छिन्नविछिन्न झाले.
अपघातानंतर संबंधित ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. मात्र, वैरागडजवळ सतर्क ग्रामस्थांनी ट्रक थांबवून चालकास पकडले व तातडीने पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे पाठवले.

दररोजचेच अपघात, कोण घेणार जबाबदारी?

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, विशेषतः मुख्य रस्त्यांवरून अवजड मालवाहू ट्रकची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरु आहे. या वाहनांचा वेग आणि निष्काळजीपणा यामुळे दररोज अपघातांचे सत्र सुरू आहे. वाहतूक सुरक्षेबाबत उपाययोजना आणि नियंत्रणे अभावित असल्याने निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत.
प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा, अशा हृदयद्रावक घटनांची पुनरावृत्ती थांबविणे कठीण ठरेल.

( #LOKVRUTTNEWS #lokvrutt.com @lokvruttnews #gadachirolinews #Maharashtra )