नाकाबंदीवर पोलिसाला चिरडणाऱ्या चालकाला शिक्षा ; न्यायालयाचा कठोर इशारा

359

– २ वर्षे सश्रम कारावास व ३० हजार दंड; न भरल्यास ६ महिने अतिरिक्त शिक्षा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २४ जुलै :– नाकाबंदीवर कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस अंमलदारास भरधाव कारने चिरडून ठार केल्याप्रकरणी आरोपी मोरेश्वर वामन हेडाऊ (वय ३५, रा. गोकुळनगर, गडचिरोली) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने २ वर्षे सश्रम कारावास व ३०,००० रुपयांच्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. हा निर्णय मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक आर. जोशी यांनी सुनावला.
लोकसभा निवडणूक २०१९ दरम्यान आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी सुरू होती. १७ मार्च २०१९ रोजी पहाटे १ वाजताच्या सुमारास आरमोरी-गडचिरोली मार्गावरील सोनुधावा परिसरात पोलीस नाईक केवळराम येलोरे हे वाहन तपासणी करत असताना, स्विफ्ट डिझायर (MH-33/0888) वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि उपचाराअगोदरच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी मोरेश्वर हेडाऊ यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४(अ), ३५३, ३३३ तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर सत्र खटला क्र. २०/२०२० दाखल करून न्यायालयात चालवण्यात आला.
सरकारी पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील निळकंठ भांडेकर यांनी युक्तिवाद केला. तपास अधिकारी म्हणून सपोनि चेतनसिंग चव्हाण यांनी तपास पूर्ण केला. कोर्ट पॅरवीसाठी पोनि चंद्रकांत वावळे, पोउपनि शंकर चौधरी, सफौ सागर मुल्लेवार, महिला पोलीस जिजा कुसनाके, मिनाक्षी पोरेड्डीवार व छाया शेट्टीवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
साक्षीदारांचे जबाब, पंचनामे आणि वैद्यकीय अहवाल यांच्या आधारे आरोपीस दोषी ठरवून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. हा निर्णय कर्तव्य बजावताना जीव गमावलेल्या पोलिसाला मिळालेला न्याय ठरला असून, बेदरकार वाहनचालकांना इशारा देणारा ठरतो.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal)