कुरखेडा पोलिसांची गांजाविरोधात मोठी धडक कारवाई : दोन तस्कर गजाआड

184

– ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकवृत्त न्यूज 
गडचिरोली, दि. २५ जुलै : जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांच्या तस्करीवर प्रभावी रोक लावण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी पुन्हा एकदा ठोस कारवाई करत ५०.५ किलोग्रॅम गांजासह दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई कुरखेडा उपविभागातील मालेवाडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत करण्यात आली असून, जप्त करण्यात आलेल्या गांजाची एकूण किंमत सुमारे ₹५.०५ लाख आहे.
२४ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धनेगाव आणि कातलवाडा या दोन गावांमध्ये एकाच दिवशी ही धडक मोहीम राबविण्यात आली. धनेगावमध्ये संशयित कालीदास पांडुरंग मोहुर्ले (वय ४०) यांच्या घरातून ४०.८२५ किलो गांजा मिळून आला. बाजारभावानुसार त्याची किंमत ₹४,०८,२५०/- इतकी असून, तो विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे मोहुर्लेने कबूल केले. त्यानंतर दुसरी कारवाई कातलवाडा येथे करण्यात आली. येथे तारेश्वर भुपाल चांग (वय ३४) यांच्या वडिलांच्या घरात ९.६७८ किलो गांजा सापडला. त्याची अंदाजित किंमत ₹९६,७८०/- आहे.
दोन्ही प्रकरणांमध्ये पुराडा पोलीस ठाण्यात NDPS कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(सी), २०(बी)(ii)(सी) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, अटक आरोपींना न्यायालयात हजर करत ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक, गोकुल राज जी, व उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोहीम पोनि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. समाधान दौड, भगतसिंग दुलत, सरिता मरकाम आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. संपूर्ण कारवाईत पोउपनि. आकाश नाईकवाडे हे तपास करीत आहेत.
ही धडक मोहीम गडचिरोली जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला बळकटी देणारी ठरली असून, गांजा तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal)