गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रश्नांवर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीची मागणी

117

गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रश्नांवर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीची मागणी

लोकवृत्त न्यूज
नागपूर, २७ जुलै :– गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकाम, रिक्त पदांची भरती आणि इतर महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेऊन सविस्तर मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वैद्यकीय आणि शैक्षणिक प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याचे आवाहन यावेळी डॉ. होळी यांनी केले.
गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी आमदार असतानाच वैद्यकीय महाविद्यालयासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे डॉ. होळी यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या काळात मेडिकल कॉलेजसाठी आंदोलन करत चक्का जाम केला होता, त्याचाच परिणाम म्हणून पुढे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर झाले आणि महायुती सरकारच्या काळात अखेर वैद्यकीय महाविद्यालयालाही मंजुरी मिळाली, असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘तुझ्या आग्रही मागणीमुळे गडचिरोलीला मेडिकल कॉलेज मिळाले’ असे स्वतः कबूल केल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
परंतु अद्याप या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी महत्त्वाच्या बाबी प्रलंबित आहेत. यामध्ये महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ४७१.४१ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने देणे, एमबीबीएसच्या द्वितीय वर्गासाठी आवश्यक २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करणे, अध्यापक, कनिष्ठ निवासी, ट्युटर तसेच गट तीन व चारच्या रिक्त पदांची भरती त्वरीत करणे, वस्तीगृहासाठी उच्च तंत्रशिक्षण सहसंचालकांकडून परवानगी मिळवणे आणि महाविद्यालयासाठी राखून ठेवलेली १५ हेक्टर आर क्षेत्र कृषी विज्ञान केंद्राकडे परत करण्याची प्रक्रिया थांबवणे या सर्व मुद्यांवर डॉ. होळी यांनी मुख्यमंत्र्यांपुढे स्पष्ट भूमिका मांडली. वनविभागाकडून जागा हस्तांतरणास अधिक कालावधी लागणार असल्याने विद्यमान जागेवरच काम सुरु ठेवण्याची विनंतीही त्यांनी केली.
गडचिरोली जिल्ह्यात सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय उभे राहत असले तरी या प्रकल्पास आवश्यक असलेल्या सुविधांचा अभाव आणि शासनस्तरावरील दिरंगाईमुळे विकासाला अडथळा निर्माण होतो आहे, अशी खंतही डॉ. होळी यांनी यावेळी व्यक्त केली. या मागण्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेत, संबंधित सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal #आरोग्य विभाग #मेडिकल )