नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार

606

– गर्भधारणा उघड, १९ वर्षीय आरोपी अटकेत

लोकवृत्त न्यूज
कोरची दि 28 :- तालुक्यातील कोटगुल पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या गावात नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. केवळ १३ वर्षीय अल्पवयीन मेहुणीवर तिच्याच १९ वर्षीय मेहुण्याने शारीरिक अत्याचार केल्याचे उघड झाले असून, या अत्याचारातून मुलगी गर्भवती राहिल्याचेही निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी काही दिवसांपासून आरोपी मेहुण्याच्या घरी राहण्यासाठी आली होती. याचदरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, शारीरिक संबंध झाले. काही दिवसांनी पीडित मुलीच्या तब्येतीत बदल दिसून आल्याने आरोग्य विभागाला संशय आला. वैद्यकीय तपासणी केली असता ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.
ही बाब उघड होताच, आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने पीडित मुलीच्या आई-वडिलांना माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने कोटगुल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपी १९ वर्षीय युवकास ताब्यात घेतले.
या प्रकरणी कोटगुल पोलिसांनी गुन्हा क्रमांक ०४/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता २०२३ चे कलम ६४(२)(1)(m) आणि ‘बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम’ (POCSO Act) २०१२ अंतर्गत कलम ४ व ६ नुसार गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.
या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास कोटगुल पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक प्रतीक्षा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal )