देसाईगंज : आणखी एक तांदूळ घोटाळा उघड, शासकीय गोदामात आढळला कुरुडच्या राईस मिलचा निकृष्ट तांदूळ
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. ४ :- गरीब लाभार्थ्यांसाठी असलेला शिधा मालच जर निकृष्ट दर्जाचा पोहोचत असेल, तर ही केवळ निष्काळजीपणाची बाब नसून संपूर्ण शासकीय पुरवठा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर बाब ठरते. असाच एक धक्कादायक प्रकार गडचिरोली शासकीय गोडाऊनमध्ये उघड झाला आहे.
देसाईगंज येथील व्यापारी आकाश अग्रवाल यांच्या गोडाऊनमधून भरलेला तांदूळ विशाल राईस मिल, कुरुड येथून शासकीय गोडाऊन गडचिरोली येथे पाठविण्यात आला. मात्र, हा तांदूळ निकृष्ट दर्जाचा असल्याचे उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात पंचनामा करण्यात आला असून, संबंधित तांदळाचा वाहतूक पास तपासून सखोल चौकशी सुरू आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवरही यामुळे संशय निर्माण झाला असून ही बाब केवळ गलथान नियोजनाचे उदाहरण नसून, शिधा पुरवठा साखळीत भ्रष्टाचाराची झलकच दाखवते, अशी तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रीय मानव अधिकार उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे यांनी दिली.
त्यांनी असा पुरवठा करणाऱ्या इतर एजन्सींच्या धान्याची तपासणी अन्न व औषध प्रशासनामार्फत तातडीने करावी, अशी मागणी करत, गरीबांच्या हक्काचा माल भ्रष्ट साखळीतून वाचवण्याची गरज अधोरेखित केली आहे.













