“नियम स्टार्टअपसाठी वेगळे?”: गडचिरोली घनकचरा निविदेत भेदभावाचा आरोप

169

– NSB Waste Management ने केली जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ५ ऑगस्ट :- गडचिरोली नगर परिषदेकडून ८ जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या निविदा प्रक्रियेत नियमभंग आणि स्टार्टअपविरोधी भेदभाव झाल्याचा गंभीर आरोप NSB Waste Management & Services Pvt. Ltd. या कंपनीने केला आहे. कंपनीने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून संपूर्ण प्रक्रियेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

NSB ही केंद्र सरकारच्या GFR 2017 अंतर्गत नोंदणीकृत स्टार्टअप कंपनी असून, त्यांना अनुभव व आर्थिक उलाढालाच्या अटींमध्ये सूट मिळते. तरीही, त्यांचा अर्ज “अनुभव अपुरा” असल्याचे कारण देत बाद करण्यात आला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, हिंदवी ऑल सप्लायर्स सर्विसेस या संस्थेला केवळ नगर पंचायत धानोरा येथे केलेल्या कार्यालयीन कामगार पुरवठ्याचा अनुभव असूनही पात्र ठरवण्यात आले, जो अनुभव प्रत्यक्षात घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधितच नाही.
यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, निविदेच्या अटींनुसार किमान दोन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्षभराचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक आहे. पण हिंदवी संस्थेकडून केवळ एका ठिकाणचा अप्रासंगिक अनुभव सादर केला गेला असूनही त्यांना निवडण्यात आले, असा आरोप NSB ने केला आहे.

NSB कंपनीने याशिवाय हीही बाब उघड केली की, निविदेपूर्व बैठकीत काही कंत्राटदारांनी आर्थिक उलाढालाच्या अटी शिथिल करण्याची मागणी केली होती. ती अट कायम ठेवण्यात आली, परंतु प्रत्यक्षात काही निवडक संस्थांना याच अटींत सूट देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

“जर एका संस्थेला अटींमधून सूट देता येते, तर आम्हालाही ती संधी मिळायला हवी होती. पण आम्हाला ‘अनुभव नाही’ या कारणावरूनच बाद करण्यात आले. ही प्रक्रिया पक्षपाती असून याची चौकशी होणे गरजेचे आहे,” असे स्पष्ट मत NSB कंपनीने मांडले.
NSB ने आपल्या निवेदनातून नियम सर्वांसाठी सारखे असावेत आणि स्टार्टअप कंपन्यांनाही समरस न्याय मिळावा, यावर ठाम भूमिका घेतली आहे.
#गडचिरोली #घनकचरा_निविदा #StartupDiscrimination #NSBWasteManagement #नियमभंग #हिंदवीऑलसप्लायर्स #LOKVRUTTNews @lokvruttnews #निविदाविवाद #GFR2017 #TransparencyMatters #गडचिरोलीनगरपरिषद #जिल्हाधिकारीचौकशी #StartupJustice #AdministrativeBias