– गडचिरोलीच्या हेडरीत हृदयविकाराचा झटका आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला वेळेवर नागपूरला पोहोचवत दाखवली माणुसकीची उंच झेप
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ६ ऑगस्ट :- अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील हेडरी येथे ड्युटीवर असताना अचानक छातीत दुखू लागल्याने पोलिस नाईक राहुल गायकवाड यांना तातडीने उपचारांची गरज निर्माण झाली. त्यांच्या जीवावर बेतले होते. पण याच संकटाच्या क्षणी मदतीचा हात पुढे केला लॉईड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी – आणि थेट हेलिकॉप्टर उडवत त्यांना नागपूरच्या रुग्णालयात सुरक्षित पोहोचवले.
२ ऑगस्ट रोजी प्रभाकरन हे गडचिरोली दौऱ्यावर होते. त्यांनी हेडरी येथील सुरजागड लोहखनिज खाणींची तपासणी केली. याच दरम्यान, एसआरपीएफ ग्रुप-२ मध्ये कार्यरत असलेले पोलिस नाईक राहुल गायकवाड (३७) छातीत तीव्र वेदना घेऊन लॉईड्स काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. डॉक्टरांनी तातडीने केलेल्या ईसीजी तपासणीत त्यांना गंभीर हृदयविकाराचा झटका (अँटीरियर लॅटरल वॉल मायोकार्डियल इन्फार्क्शन) आल्याचे निदान झाले.
त्यांना आयसीयूमध्ये हलवून उपचार सुरू करण्यात आले, मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना तातडीने नागपूरच्या उच्चस्तरीय रुग्णालयात हलवणे गरजेचे होते. पोलिस विभागाने एलएमईएलशी संपर्क साधताच, प्रभाकरन यांनी कोणताही वेळ न दवडता कंपनीचे खासगी हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतः पायलटची जागा घेतली आणि २:४५ वाजता हेलिकॉप्टर हेडरीहून उडवले.
हेलिकॉप्टरमध्ये रुग्णासोबत नर्सिंग स्टाफही होता. दुपारी ३:४० वाजता नागपूर विमानतळावर हेलिकॉप्टर उतरले. तिथे आधीच तयार असलेल्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी गायकवाड यांना हलवण्यात आले. तपासणीत त्यांच्या हृदयातील एक धमनी पूर्णतः ब्लॉक असल्याचे आढळले. तात्काळ स्टेंट बसवण्यात आला आणि ५ ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
प्रभाकरन यांना उड्डाणाची प्रचंड आवड असून, त्यांच्या नावावर वैध पायलट लायसन्स आहे. त्यांनी आपल्या वेळापत्रकातील सर्व बैठका रद्द करून, फक्त एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली.

