शिंदे गटात गडचिरोलीत गोंधळ : दोन जिल्हाप्रमुखांमध्ये सर्किट हाऊसमध्ये हाणामारी

323

– श्रेयवाद उफाळला

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ७ ऑगस्ट २०२५ :- शिवसेना (शिंदे गट) मध्ये अंतर्गत वाद शिगेला पोहोचला असून गडचिरोलीत थेट दोन जिल्हाप्रमुखांनी एकमेकांवर हात उचलल्याची खळबळजनक घटना आज ७ ऑगस्ट रोजी घडली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे हे आज गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर होते त्यांच्या दौऱ्यानिमित्त सर्किट हाऊसमध्ये आयोजित बैठकीदरम्यान ही धक्कादायक घटना घडल्याचे कळते.
दौऱ्यानंतर मंत्री भुसे हे चंद्रपूरकडे रवाना झाले, आणि त्यानंतर लगेचच गडचिरोली जिल्हाप्रमुख संदीप ठाकूर आणि अहेरी जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यात श्रेयवादावरून जोरदार वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की, दोघे एकमेकांवर तावातावाने ओरडू लागले, झटापटीही झाल्या आणि काही क्षणातच सर्किट हाऊसचा परिसर रिंगणात बदलला.
या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी आणि कुरघोडीचे राजकारण उघड झाले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, पक्षातील एकजुटीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणावर अद्याप कोणतीही पोलिस कारवाई झाली नसून, पक्षाकडूनही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या हाणामारीमुळे पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.