पायल किनाके यांची Y20 Summit 2025 साठी भारतातून निवड
लोकवृत्त न्यूज
नागपूर, दि. १९ :- विदर्भातील कन्या आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रांत मंत्री कु. पायल किनाके यांची प्रतिष्ठेच्या Y20 Summit 2025 या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेसाठी भारतातून प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. ही परिषद दक्षिण आफ्रिकेतील जॉन्सबर्ग येथे १८ ते २२ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
या परिषदेत जगभरातील निवडक तरुण प्रतिनिधी एकत्र येऊन जागतिक प्रश्नांवर विचारमंथन करणार आहेत. भारताचे प्रतिनिधित्व करताना कु. किनाके विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भारताचा दृष्टीकोन, धोरणे आणि तरुणाईची भूमिका ठळकपणे मांडणार आहेत.
अभियान, पर्यावरण, रोजगार, तंत्रज्ञान, शांतता आणि सहकार्य यांसारख्या विषयांवर भारताच्या तरुण पिढीचा आवाज पोहोचविण्याची ही संधी असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. “भारताचा आवाज जागतिक स्तरावर ठळकपणे उमटेल” असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
कु. पायल किनाके यांच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

