अमिर्झा गावात नळ योजना ठप्प – ग्रामस्थ पाण्यासाठी हैराण, संतप्त नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा

218

अमिर्झा गावात नळ योजना ठप्प – ग्रामस्थ पाण्यासाठी हैराण, संतप्त नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- गडचिरोलीपासून अवघ्या २० किमीवर असलेल्या अमिर्झा गावात गेल्या आठवड्यापासून नळयोजना ठप्प पडल्याने गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. महिलांपासून शेतकरी, विद्यार्थी ते वृद्धांपर्यंत सर्वच स्तरातील नागरिकांना पाण्याच्या एका घागरीसाठी प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून गावात अक्षरशः पाणीअभावी हाहाकार माजला आहे.

नळयोजना बंद झाल्याने नागरिक विहिरी, हँडपंप व खाजगी बोअरवेलवर अवलंबून आहेत. सकाळी व संध्याकाळी बादल्या, घागऱ्या घेऊन रांगेत उभ्या असलेल्या महिलांचे चित्र दररोज दिसते. एका घागर पाण्यासाठी भांडण होण्याची वेळ आली असून गावात तणावपूर्ण वातावरण आहे.

भर पावसाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थ दूषित पाणी वापरण्यास भाग पाडले जात आहेत. त्यामुळे कॉलरा, टायफाईड, अतिसार यांसारख्या साथरोगांचा धोका निर्माण झाला असून प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. लहान मुले व वृद्ध नागरिकांच्या आरोग्यावर मोठे संकट ओढवले आहे.

याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. “वारंवार मागणी करूनही अधिकारी व पदाधिकारी हलगर्जीपणे केवळ आश्वासनेच देतात. पाणी हा आमचा जगण्याचा मूलभूत हक्क आहे, तो तातडीने उपलब्ध करून द्यावा,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिसाद मिळालेला नसला तरी गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे – “नळयोजना सुरू झाली नाही, तर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून संपूर्ण गाव एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडू.”

अमिर्झा गावातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस चिघळत असून लवकर उपाययोजना न झाल्यास ग्रामस्थ व प्रशासन आमनेसामने उभे ठाकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.