गडचिरोली : रानटी हत्तीच्या हल्ल्यात गुराखी ठार

1096

– ग्रामस्थांची वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनेची मागणी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ता. १० -: जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रातील पोर्ला हद्दीत आज सकाळी भीषण घटना घडली. चुरचुरा येथील वामन मारुती गेडाम हा नेहमीप्रमाणे गुराखी गुरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेला असता रानटी हत्तीच्या हल्ल्यात जागीच ठार झाला. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी वनविभागाकडे तात्काळ उपाययोजनेची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमिर्झा, चुरचुरा, दिभना परिसरात रानटी हत्तींचा कळप सतत वावरत आहे. आज नेहमीप्रमाणे गुराख्याने गुरे राखण्यासाठी जंगलाचा रस्ता धरला असता अचानक आलेल्या हत्तीने त्याच्यावर हल्ला केला. हल्ला इतका जबर होता की त्याचा मृत्यू जागीच झाला. घटनेची माहिती मिळताच पोर्ला वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून ओडिशा राज्यातून रानटी हत्तींचे कळप गडचिरोली जिल्ह्यात दाखल होत आहेत. या हत्तींच्या स्थलांतरामुळे शेतजमिनींचे प्रचंड नुकसान होत असून ग्रामस्थांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. हत्तींचा वाढता वावर वनविभागासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशा पार्श्वभूमीवर आजच्या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आणखी गडद झाले असून त्यांनी वनविभागाने तातडीने पावले उचलून हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे, बाधित कुटुंबाला शासनाने तात्काळ मदत द्यावी आणि संरक्षणाची ठोस यंत्रणा उभी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
@Lokvrutt_News #lokvruttnews #Lokvrutt.com
#Gadchiroli #WildElephant #ElephantAttack #Shepherd #ForestDepartment #Villagers #Government #Protest #OdishaElephants #ForestConflict #लोकवृत्त #गडचिरोली #रानटीहत्ती #हत्तीहल्ला #गुराखा #वनविभाग #ग्रामस्थ #शासन #आंदोलन #ओडिशाहत्ती #जंगल