– उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
लोकवृत्त न्यूज
मुंबई :- महाराष्ट्र शासनाने राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नवे आदेश कडक शब्दांत दिले असून आता प्रत्येकाने कार्यालयात प्रवेश करताना तसेच कार्यालयीन वेळेत आपले ओळखपत्र (Identity Card) दर्शनी भागावर लावणे सक्तीचे केले आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून १० सप्टेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकाला शासनाने विशेष महत्त्व दिले असून “नियमांचे पालन न करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
शासनाने यापूर्वी दि. ६ फेब्रुवारी १९८० रोजीच्या शासन निर्णयाद्वारे, तसेच दि. ७ मे २०१४ व दि. १० ऑक्टोबर २०२३ रोजी परिपत्रकाद्वारे यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. तरीदेखील काही शासकीय अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत ओळखपत्र न लावताना आढळून आले आहेत. शासनाच्या दृष्टीने ही गंभीर बाब असल्याने पुन्हा एकदा या नियमाचे पालन अनिवार्य करण्यात आले आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन परिसरात प्रवेश केल्याबरोबर आपले ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे आवश्यक आहे. ओळखपत्र लावणे ही केवळ औपचारिकता नसून कार्यालयीन शिस्त, सुरक्षितता आणि पारदर्शकतेसाठी अत्यावश्यक बाब असल्याचे शासनाने अधोरेखित केले आहे.
कार्यालयीन परिसरात नागरिक, विविध विभागातील अधिकारी तसेच इतर कर्मचारी नियमितपणे ये-जा करत असल्याने ओळखपत्र लावल्यामुळे प्रत्येकाची ओळख त्वरित पटते, गैरप्रवृत्ती रोखण्यास मदत होते आणि पारदर्शकतेला चालना मिळते. शासनाच्या मते, हा नियम नागरिकांसाठी विश्वासार्हता निर्माण करणारा आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, जर कोणी अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयीन वेळेत ओळखपत्र न लावताना आढळून आला तर त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे. म्हणजेच कार्यालयीन प्रमुखानेच आपल्या अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हा नियम काटेकोरपणे पाळला आहे की नाही, यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
शासनाच्या या ताज्या परिपत्रकामुळे राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा एकदा शिस्त आणि सुरक्षिततेला बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच नागरिकांमध्येही शासकीय कार्यालयांबाबत पारदर्शकतेची भावना अधिक दृढ होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
#Lokvrutt News @lokvruttnews @LOKVRUTT.COM
#Maharashtra #GovernmentOrder #IdentityCard #GovtEmployees #शासनपरिपत्रक

