कोरची नगरपंचायतीत खळबळ : नोकरीसाठी दिलेला राजीनामा नगराध्यक्षांनी वर्षभर लपविला

27

कोरची नगरपंचायतीत खळबळ : नोकरीसाठी दिलेला राजीनामा नगराध्यक्षांनी वर्षभर लपविला

लोकवृत्त न्यूज
कोरची (ता. प्र.) : कोरची नगरपंचायतीतील काँग्रेसच्या नगराध्यक्षा हर्षलता भैसारे यांचा मोठा गैरप्रकार उघड झाला आहे. प्रभाग क्रमांक २ मधून निवडून आलेल्या नगरसेविका भगवती मयाराम सोनार यांनी पोलिस विभागात शिपाई पदावर रुजू होताना ११ ऑगस्ट २०२४ रोजी नगरसेवक पदाचा राजीनामा नगराध्यक्षा यांच्याकडे दिला होता. मात्र सत्ता गमावण्याच्या भीतीने नगराध्यक्षा भैसारे यांनी हा राजीनामा तब्बल वर्षभर लपवून ठेवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

नियमाप्रमाणे कोणत्याही कारणाने नगरसेवकाचे पद रिक्त झाल्यास सहा महिन्यांत पोटनिवडणूक घेणे बंधनकारक असते. पण, जर राजीनामा जाणीवपूर्वक लपवला गेला, तर नगराध्यक्षांवर कारवाई होऊ शकते. तरीही भैसारे यांनी राजकीय समीकरणे बिघडू नयेत यासाठी सोनार यांचा राजीनामा दाबून ठेवल्याचा आरोप होत आहे.

कोरची नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता असून ८ नगरसेवकांच्या पाठिंब्यावर (७ काँग्रेस + १ रिपाई व १ अपक्ष) बहुमत टिकवले आहे. परंतु भगवती सोनार यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची सत्ता अल्पमतात येण्याचा धोका होता. त्यामुळेच हा राजीनामा दबवून ठेवण्यात आला, असा संशय राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे भाजप नगरसेवकांना देखील सोनार यांच्या पोलिस सेवेत रुजू झाल्याची माहिती असूनही त्यांनी वर्षभर यावर आक्षेप नोंदवला नाही, यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, भगवती सोनार यांचे नाव अजूनही नगरपंचायतच्या प्रशासकीय नोंदीत नगरसेवक म्हणून कायम आहे. सतत गैरहजर राहिल्याने त्यांची सदस्यता रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केल्याचे मुख्याधिकारी गणेश सोनवाने यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नगराध्यक्षा हर्षलता भैसारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या गंभीर गैरप्रकाराबाबत त्यांची बाजू समजू शकली नाही.
या धक्कादायक प्रकरणामुळे कोरची नगरपंचायतीतील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून सत्ताधाऱ्यांवरील लोकांचा अविश्वास अधिकच दृढ झाला आहे.

#लोकवृत्त #कोरची_नगरपंचायत #राजीनामा_लपवला #काँग्रेस #भाजप #राजकीय_गैरप्रकार #गडचिरोली #नोकरीसाठी_राजीनामा #नगरसेविका_भगवती_सोनार #नगराध्यक्षा_हर्षलता_भैसारे #लोकशाही #गैरव्यवहार #Lokvrutt_News #lokvruttnews @Lokvrutt.com #KorchiMunicipality #ResignationSuppressed #Congress #BJP #PoliticalScandal #Gadchiroli #ResignationForJob