एलएमईएलकडून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय : कोनसरीतील १९ महिला कंपनीच्या कार्यबलात दाखल
लोकवृत्त न्यूज
कोनसरी : कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) ने कोनसरी गावातील १९ महिलांना आपल्या कुशल कार्यबलात सामील करून घेतले आहे. एलएमईएल-प्रायोजित हलकी मोटार वाहन चालविण्याचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर या महिलांना कंपनीत रोजगाराची संधी मिळाली.
यंदा जून महिन्यात एलएमईएलने या महिलांना मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील अशोक लेलँड प्रशिक्षण केंद्रात ४५ दिवसांच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पाठवले होते. या काळात त्यांनी हलकी मोटार वाहने चालविण्याचे कौशल्य आत्मसात केले. प्रशिक्षणामुळे त्यांच्या आत्मविश्वासासोबतच सामाजिक प्रतिष्ठाही वाढली असून, कुटुंबीयांनीही अभिमान व्यक्त केला.
कोनसरी येथील लॉईड्स कौशल्य विकास आणि प्रशिक्षण केंद्रात आयोजित समारंभात या महिलांना नियुक्तीपत्रे, प्रशिक्षण यशस्वी झाल्याचे प्रमाणपत्र, वाहनचालन परवाने आणि पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी एलएमईएलचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “समुदाय सक्षमीकरण हा लॉईड्स मेटल्सच्या यशाचा पाया आहे. व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या दृष्टीकोनातून महिलांना कौशल्यविकासाद्वारे प्रगतीच्या नव्या संधी मिळाव्यात, कार्यबलात लैंगिक समानता नांदावी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, हा आमचा प्रयत्न आहे.”
नवनियुक्त महिलांना शिस्त, सुरक्षितता आणि जबाबदारी अंगीकारून उच्च पदांवर प्रगती करण्याचे मार्गदर्शनही करण्यात आले.

