– शासकीय योजनांच्या जाहिरातीपेक्षा मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीला महत्त्व ?
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :-शासन आपल्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार जाहिरातींमधून करत असताना गडचिरोली शहरात काही ठिकाणी आश्चर्यकारक प्रकार उघडकीस आला आहे. कामगार विभागाने सर्वोदय वॉर्डमध्ये घरांच्या भिंतीवर लावलेल्या शासकीय जाहिराती झाकून त्यावर थेट मुख्यमंत्री यांची “देवाभाऊ” अशी नवी जाहिरात चिकटवण्यात आली आहे. यात मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांना फुल अर्पण करताना दाखविण्यात आले असले तरी नेमके या जाहिरातीचा हेतू काय आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शासकीय योजनांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी शासन मोठा खर्च करून जाहिराती लावते. मात्र त्याच जाहिराती झाकून व्यक्तिपूजक जाहिराती लावल्या जाणे म्हणजे शासनाच्या योजनांची थेट गळचेपी असल्याची टीका होत आहे. “शासकीय योजनांपेक्षा मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक प्रतिमेला महत्त्व दिले जात आहे काय?” असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.
यापूर्वीही विविध शहरांमध्ये राजकीय जाहिरातींमुळे शासकीय संदेश आडवले गेले असल्याचे प्रकरणे समोर आली आहेत. अशा प्रकारावर निवडणूक आयोग तसेच स्थानिक प्रशासनाने कारवाई करण्याचे आदेश दिलेले असतानाही गडचिरोलीत असा प्रकार होणे हे शासनाच्या प्रसिद्धी यंत्रणेलाच चपराक आहे, असे मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातींची जबाबदारी नेमकी कोणाची आहे, हा प्रकार कोणी व केव्हा केला, तसेच शासकीय जाहिराती झाकणाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
#गडचिरोली #शासनजाहिरात #मुख्यमंत्रीजाहिरात #देवाभाऊ #कामगारविभाग #प्रशासनकारवाई #जिल्हाधिकारीचौकशी #लोकवृत्त
#Gadchiroli #GovernmentSchemes #CMAd #Devabhau #LabourDepartment #AdministrationAction #DistrictCollectorInquiry

