सी-६० जवान, अपर पोलीस अधीक्षकांचा पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्या हस्ते गौरव

406

– गडचिरोलीत माओवादविरोधी अभियानात पराक्रम

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील माओवादविरोधी अभियानात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सी-६० कमांडो पथकासह अधिकारी व अपर पोलीस अधीक्षकांचा सन्मान पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आला.
पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमात, कवंडे जंगल परिसरात झालेल्या चकमकीत ०१ दलम कमांडरसह ०४ कट्टर माओवादी, कोपर्शी-फुलनार जंगल परिसरात ०१ पीपीसीएमसह ०४ माओवादी तसेच मोडस्के जंगल परिसरात ०१ कमांडरसह ०२ जहाल महिला माओवादी अशा एकूण १० माओवादींचा खात्मा करण्यात यश आले होते. या तिन्ही चकमकींमध्ये सहभागी विशेष अभियान पथकातील अधिकारी व जवानांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
या मोहिमेचे नेतृत्व करणारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मार्गदर्शनपर भाषण करताना श्रीमती रश्मि शुक्ला म्हणाल्या की, “सी-६० चे अधिकारी व जवान यांनी अत्यंत शौर्य, धैर्य व व्यावसायिक कौशल्याने माओवादविरोधी मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.” त्यांनी उर्वरीत माओवादी कार्यकर्त्यांना हिंसेचा त्याग करून शस्त्रे खाली ठेवत लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आणि शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले.
या सन्मानाने गडचिरोली पोलिसांचे मनोबल आणखी उंचावले असून, माओवाद निर्मूलन मोहिमेला नवचैतन्य मिळाले आहे.