गडचिरोलीत खड्ड्यांमुळे भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत दोघे सख्खे भाऊ ठार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १४:- शहरातील आरमोरी मार्गावरील प्लॅटिनम स्कूल जवळील दर्गा समोर आज दुपारी सुमारे १२.३० वाजता दुर्दैवी अपघात झाला. ट्रकच्या धडकेत दोघे सख्खे भाऊ ठार झाले. या
प्राप्त माहितीनुसार, पुरुषोत्तम बाबूराव बारसागडे (वय ४०), रा आणि अंकुश बाबुराव बारसागडे (वय ३५) रा. सुभाष वार्ड हे दोघे भाऊ MH-33-R-7789 क्रमांकाच्या दुचाकीने शेतातून आरमोरी रोड मार्गे गडचिरोली कडे घरी जात होते. दरम्यान, गडचिरोली शहरातून आरमोरी कडे जाणाऱ्या MH-34-BG-8657 क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने दुचाकीस समोरून जबर धडक दिली. या घटनेत दोघेही भाऊ जागीच ठार झाले, तर त्यांच्या अपघाती निधनाने बारसागडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुरुषोत्तम यांना एक मुलगा व मुलगी आहेत तर अंकुश यांना एक मुलगा आहे. महेश माणिक पुरी (वय ३२, रा. चंद्रपूर) असे ट्रकचालकाचे नाव असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते. पुढे तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.
स्थानिक सूत्रांनुसार, हा अपघात रस्त्यावरील खड्डे टाळताना झाला आहे. आरमोरी मार्गावरील खड्ड्यांची दुरवस्था नागरिकांसाठी दररोज जिवघेणी धोकादायक ठरत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. जिल्हाधिकारी यांनी काही दिवसांपूर्वीच फर्मान काढला होता की, खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित विभाग दोषी ठरवला जाईल, त्यामुळे या प्रकरणात जबाबदारी कोणावर येणार हे लक्षवेधक ठरणार आहे.
आरमोरी मार्गावरील खड्डे नागरिकांच्या जिव्हारी
इंदिरा गांधी चौकापासून आरमोरी मार्गावरील रस्ता अनेक ठिकाणी खड्ड्यांनी जर्जर झाला असून, प्रशासन सामान्य नागरिकांची सुरक्षा दुर्लक्षित करत आहे. मोठे पुढारी व मंत्री आले त्याचे दरम्यान या मार्गाची डागडुजी होते आणि सामान्य लोकांची सुरक्षा मात्र दुर्लक्षित राहते.
एकीकडे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याला स्टील हब म्हणून विकसित करण्याचे घोषवाक्य देतात, मात्र जिल्हा मुख्यालयाचा हा ढासळलेला रस्ता सामान्य नागरिकांसाठी धोकादायक आहे. नागरिकांच्या भावना व्यक्त करताना असेही म्हटले जात आहे की, पालकमंत्री फक्त हवाई दौऱ्यांवर येतात; कधी प्रत्यक्ष रस्ता तपासण्यासाठी येतील, हे पाहणे आवश्यक आहे.













