बोगस मजूर, खोट्या स्वाक्षऱ्या आणि कोट्यवधींचा खेळ’ : आलापल्ली-पेरमिली वनपरिक्षेत्रातील घोटाळा उघडकीस

106

डॉ. प्रणय खुणे यांचा पत्र परिषदेत आरोप

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली वनविभागातील आलापल्ली व पेरमिली वनपरिक्षेत्रांमध्ये बोगस मजुरांच्या नावे खोट्या स्वाक्षऱ्यांद्वारे कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाला असून गडचिरोली वनविभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे आज येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे. या प्रकरणी संबंधित वनाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. खुणे म्हणाले की, वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने शासकीय निधीचा अपहार करण्यात आला आहे. चौकशी अधिकार्‍यांनीही बोगस चौकशी करून संबंधितांना पाठीशी घातल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती गठित करून फौजदारी गुन्हा नोंदवावा. तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यात यावी, अशी मागणी डॉ. प्रणय यांनी केली आहे.

सन २०२३-२४ व २०२४-२५ या कालावधीतील जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण आदिवासी उपयोजना, राज्य योजना, कॅम्पा योजना व संयुक्त वनव्यवस्थापन समिती अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्येही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी पत्र परिषदेतून केला आहे.

या पत्रकार परिषदेला शंकर ढोलगे, मनिषा मडावी, कृष्णा वाघाडे, रवी सेलोटे, विलास भानारकर, योगेश सिडाम, राहुल वासनिक, प्रवीण ठाकरे, आदर्श धुरके, दिलीप मेवगंटीवार, विजय मज्जी आदी उपस्थित होते.