गडचिरोली : रानटी हत्तींचा कळप पोहचला जिल्हा मुख्यालयाच्या वेशीवर

741

– माडेतुकूम परिसरात शेतपिकांचे मोठे नुकसान

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात भटकत असलेला रानटी हत्तींचा कळप जिल्हा मुख्यालयाच्या वेशीवर पोहचला असून माडेतुकूम येथील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
काल पर्यंत हा कळप चुरचुरा जंगल परिसरात वावरत होता मात्र मध्यरात्री हा कळप अचानकपणे माडेतुकूम परिसरात दाखल झाल्याचे कळते.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या माडेतुकूम परिसरात हत्तींच्या कळपाने मध्यरात्री अचानकपणे धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचे दिसून आले. हत्तींचा कळप गावाजवळील शेतात दाखल झाल्याची माहिती गावकऱ्यांना कळताच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून अधिकारी सकाळीच घटनास्थळी पोहचून लागलीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे पंचनामे सुरू केल्याची माहिती आहे.
दरम्यान हत्तीच्या कळपाची हालचाली वाढल्याने हत्तीजवळ कोणीही जाऊ नये, व्हिडिओ, सेल्फी घेऊ नये , रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.