गडचिरोली : माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरी दारूचा महापूर, पोलिसांची पहाटेची धडक कारवाई

285

 ४५ पेट्या जप्त, भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे. भाजप नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर तसेच त्यांचे पती भाजप युवा आघाडी जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर यांच्या वालसरा (ता. चामोर्शी) येथील निवासस्थानी पोलिसांनी मंगळवारी पहाटे छापा टाकून तब्बल ४५ पेट्या देशी दारू जप्त केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गुप्त माहितीनुसार चामोर्शी पोलिसांनी ही कारवाई केली असून, भाजप युवा आघाडीचे चामोर्शी तालुका उपाध्यक्ष रामचंद्र केशव भांडेकर (मधुकर भांडेकर यांचे लहान बंधू) यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात दारू साठवली गेल्याचे उघड झाल्यानंतर स्थानिक राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा रंगली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा साठा मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न होता का? असा सवाल नागरिक आणि विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
समाजमाध्यमांवर या घटनेविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, “जनतेसमोर आदर्श व कायद्याचे पालन करण्याचा उपदेश देणारे नेतेच नियम मोडतात, हे जनतेचा विश्वासघात आहे,” अशा शब्दांत लोकांनी रोष व्यक्त केला आहे.
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून असा प्रकार समोर आल्यानंतर पोलिस व निवडणूक आयोगाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.