गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस बिथरली; युवानेते अतुल मल्लेलवारांसह सहकाऱ्यांचा भाजपमध्ये मोठा प्रवेश

609

– निवडणुकीची समीकरणे बदलणार!

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ता. २२ :- नगरपरिषद निवडणुकीची चाहूल लागताच गडचिरोलीत राजकीय तापमान प्रचंड वाढले असून आज काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि जिल्ह्यातील प्रभावी युवानेते अतुल मल्लेलवार, अमित संगीडवार यांच्यासह डझनभर ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट भाजपचा हात धरत काँग्रेसमध्ये धुमाकूळ घातला आहे.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या सर्व नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत करत, “गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीत भाजपची लाट आणखी प्रबळ झाली आहे,” असे महत्त्वपूर्ण विधान केले.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर यांच्या प्रचारासाठी मंत्री बावनकुळे आज गडचिरोलीत दाखल झाले होते. याच ठिकाणी चामोर्शी रोडवरील भाजपच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर झालेला काँग्रेस नेत्यांचा मोठा पलायन हा निवडणुकीतील ‘गेम चेंजर’ ठरत असल्याचे राजकीय वर्तुळातील बोलणे आहे.
अतुल मल्लेलवार हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार यांचे पुत्र असून अनेक वर्षे काँग्रेसमध्ये सक्रिय नेतृत्व व संघटन कौशल्य दाखवले आहे. अशा वजनदार नेत्यांसह दहा वर्षांच्या अनुभवी कार्यकर्त्यांनी काँग्रेसची नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या गोटात तुफान खळबळ उडाली आहे.
फक्त १० दिवसांवर आलेल्या मतदानाआधी काँग्रेसची ही मोठी गळती पक्षासाठी धोक्याची घंटा मानली जात असून, शहरभर “गडचिरोलीची निवडणूक आता नव्या वळणावर” अशी चर्चा चांगलीच रंगली आहे.