प्रत्येक प्रभागात वाचनालय–जिम उभारण्याच्या आश्वासनावर जनतेचा प्रश्न
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. 2 :- गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक प्रभागात सुसज्ज वाचनालय आणि आधुनिक जिम उभारण्याचे आश्वासन जाहीर करण्यात आले आहे. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नवा ऊर्जावान दृष्टीकोन मांडत शहराच्या प्रगतीस नवी दिशा देण्याचा दावा करण्यात आला. मात्र या भव्य घोषणेमागील वास्तवतेबाबत नागरिकांमध्ये गंभीर शंका निर्माण झाली आहे.
घोषणा करताना असे सांगितले गेले की, ‘ प्रत्येक नागरिकाला ज्ञान, फिटनेस आणि आरोग्याच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत. उत्तम वाचनालयांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे प्रेरक वातावरण मिळेल, तर आधुनिक जिममुळे सर्वांना आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारता येईल.’
परंतु घोषणेनंतर नागरिकांनी अनेक महत्वाचे प्रश्न उभे केले आहेत. ही वाचनालये आणि जिम नेमके कोण उभारणार – नगर परिषद की खासगी संस्था? ही सुविधा मोफत मिळणार की शुल्क आकारले जाणार? प्रत्येक प्रभागात एवढी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे का? निधी कुठून येणार?
तसेच, यापूर्वीही याच सत्ताकाळात तयार करण्यात आलेली अनेक उद्याने आज मोडकळीस आलेली आहेत. काही ठिकाणी व्यायाम साहित्यही निष्क्रिय अवस्थेत पडून असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अशा परिस्थितीत नवे वाचनालय–जिम उभारण्याच्या आश्वासनावर लोकांमध्ये संशय अधिकच वाढत आहे.
त्यामुळे नवी वाचनालय–जिम योजना प्रत्यक्षात येणार की निवडणुकीत दाखविलेले आणखी एक गाजर ठरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरातील नागरिक म्हणतात, ‘आधी उभारलेली उद्याने व सार्वजनिक सुविधा सुधारल्या नाहीत, तर नवीन प्रकल्प प्रत्यक्षात येणार कसे?’
या पार्श्वभूमीवर अनेक मतदारांना हे नवीन आश्वासन निवडणुकीच्या तोंडावर दाखविलेले गाजर ठरणार की प्रत्यक्षात कृतीदेखील होणार, याची उत्सुकता असून निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोलीत घोषणांचे राजकारण तापत असताना, हे आश्वासन केवळ कागदावरच राहणार की खरोखरच शहराच्या विकासासाठी कृती दिसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










