लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागरिकांसाठी अद्याप वेळ काढू शकले नसतानाच नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मात्र विशेष भेट ठरवल्याची चर्चा जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे. ‘ नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष, पण प्रचारासाठी तातडी’ अशी बोचरी टीका सर्वसामान्यांच्या तोंडी ऐकू येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीस उद्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून भाजपच्या प्रचारसभेला उपस्थित राहणार आहेत. मात्र या भेटीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. ‘जिल्ह्यातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कधीच वेळ नाही, पण सभेसाठी वेळ कसा काय मिळाला?’ असा सवाल लोकांकडून उपस्थित केला जात आहे.
यावेळी मुख्यमंत्री हवाई मार्गाने न येता थेट रोडमार्गे येणार असल्याचेही कळते. त्यामुळे आरमोरी–गडचिरोली मार्गावरील खड्ड्यांची अचानक दुरुस्ती, रस्त्यांना चकचकीत लुक देण्याची धांदल प्रशासनाकडून सुरू होणार अशी चर्चादेखील जोमात आहे. ‘जनतेने कित्येक दिवस पाठपुरावा केला तरी रस्ता दुरुस्तीची दखल नाही; पण मुख्यमंत्र्यांचा ताफा येणार म्हणूनच कामाला गती’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया नागरिक देताना दिसत आहेत.
पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी फारशी उपस्थिती दाखवू शकले नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे. उद्घाटन, कार्यक्रम आणि समारंभापुरतेच मर्यादित दौरे झाल्याचा आरोपही करण्यात येतो. अशात अचानक प्रचारसभेसाठी वेळ काढल्याने टीकेची सरबत्ती सुरू झाली आहे.
एकूणच, निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून नागरिकांच्या नाराजीने राजकीय वातावरणात नवा रंग भरला आहे.













