असोला मेंढा तलावात मासेमारीला गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू
लोकवृत्त न्यूज
सावली, दि. 04 डिसेंबर :-असोला मेंढा तलावात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या युवकाचा डोंगा उलटल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दुपारच्या सुमारास घडली. मयताचे नाव भगवान रमेश गेडाम (वय 32, रा. आसोला चौक) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भगवान गेडाम एकटाच तलावात मासेमारीसाठी गेला होता. जाळे टाकत असताना अचानक डोंगा पलटल्यानं तो पाण्यात पडला आणि बुडून मृत्यू झाला. गावकऱ्यांनी ही घटना पाहताच पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सपोनि नितेश डोर्लीकर, सहाय्यक फौजदार सतीश गुरनुले, पोलीस हवालदार खेलेश कोरे, पोलीस अंमलदार मेघश्याम गायकवाड, बळीराम बारेकर व प्रविण कोवे यांसह पथक घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.













