मुख्य चौक ठप्प! इंदिरा गांधी चौकात रात्रभर लोहखनिज ट्रॅक फेल

336

 ट्रक मालकांची निष्काळजीपणा, नागरिकांचा जीव धोक्यात

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : शहरातील अत्यंत वर्दळीच्या इंदिरा गांधी चौकामध्ये लोहखनिज वाहतूक करणारा एनएल-०१ एजे-९८१४ क्रमांकाचा मालवाहू ट्रॅक काल रात्रीपासून फेल अवस्थेत उभा आहे. आज सकाळी ९ वाजेपर्यंतही तो घटनास्थळीच असल्याने संपूर्ण चौकातील वाहतूक विस्कळीत झाली असून, यामागे ट्रक मालक व वाहतूक कंत्राटदारांची गंभीर निष्काळजीपणा समोर येत आहे.

इंदिरा गांधी चौक हा चामोर्शी, आरमोरी व शहरातील प्रमुख मार्गांना जोडणारा अत्यंत संवेदनशील चौक आहे. सिग्नल व्यवस्था कार्यरत असतानाही रस्त्याच्या मधोमध उभा राहिलेला जड मालवाहू ट्रॅक नागरिकांसाठी धोक्याचा ठरला आहे. विशेष म्हणजे ट्रॅक फेल झाल्यानंतर तो तत्काळ हटविण्याची जबाबदारी संबंधित ट्रक मालक व कंपनीची असताना, त्यांनी कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने नागरिकांना फटका बसत आहे.

सकाळच्या शाळेच्या वेळेत या चौकात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी लोहखनिजाने भरलेला ट्रॅक तासन्‌तास उभा राहणे हे गंभीर बाब असून, संभाव्य अपघाताची पूर्ण जबाबदारी ट्रकचे मालक, चालक व वाहतूक कंत्राटदारांवर येते.

शहरातून मोठ्या प्रमाणात धावणाऱ्या अवजड मालवाहू वाहनांमुळे आधीच अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, अशा निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या घटनेत वाहतूक पोलिसांची कोणतीही चूक नसून, वेळेवर सूचना देऊनही ट्रक हटविण्यात आलेला नाही, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता अशा प्रकारे रस्त्यावर फेल झालेले अवजड वाहन त्वरित न हटविणाऱ्या ट्रक मालकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.