१०० हून अधिक सिलेंडर जप्त
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :- घरगुती वापरासाठी सबसिडीवर उपलब्ध असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरचा सर्रास व्यावसायिक वापर व काळाबाजार गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्या नेतृत्वात दिनांक १३ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांत एकाचवेळी विशेष धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, खरेदी अधिकारी (नोडल), तालुकास्तरीय निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक, लिपिक व शिपाई अशा एकूण ७८ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकांनी हॉटेल्स, ढाबे तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांवर छापे टाकून कसून तपासणी केली.
तपासणीदरम्यान घरगुती (लाल रंगाचे) एलपीजी सिलेंडर व्यावसायिक वापरासाठी वापरले जात असल्याचे निदर्शनास आल्याने शंभरहून अधिक गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. सबसिडीचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक हेतूने गॅस वापर केल्यामुळे शासनाच्या योजनांचा दुरुपयोग होत असून, याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या घरगुती गॅस पुरवठ्यावर होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले.
यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, “घरगुती एलपीजी सिलेंडर फक्त घरगुती वापरासाठीच आहेत. व्यावसायिकांनी निळ्या रंगाचे कमर्शियल एलपीजी सिलेंडर वापरणे बंधनकारक आहे. घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर हा कायद्याने गुन्हा असून दोषींवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. अशा कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहतील.”
जप्त करण्यात आलेले सिलेंडर संबंधित गॅस वितरकांकडे सुपूर्द करण्यात येत असून, संबंधित व्यावसायिकांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई व तपास सुरू आहे. जिल्ह्यातील नागरिक व व्यावसायिकांनी घरगुती गॅसचा काळाबाजार किंवा व्यावसायिक वापर करू नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.










