तेलंगणात मजूर वाहतूक पिकअपला भरधाव हायव्याची धडक तीन मजूर ठार, अनेक गंभीर जखमी

556

– पोटासाठी परराज्यात गेलेल्या कुटुंबांवर शोककळा

लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर :- धानाची फसल संपल्यानंतर रोजीरोटीचा कोणताही आधार नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी तेलंगणा राज्यात धान रोवणीसाठी गेलेल्या सावली व मूल तालुक्यातील मजुरांवर काळाने घाला घातला. तेलंगणा राज्यातील मंचुरियलजवळ आज पहाटे घडलेल्या भीषण अपघातात तीन मजूर महिलांचा मृत्यू झाला असून अनेक मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
सावली व मूल तालुक्यातील जवळपास २० मजूर काल रात्री दहाच्या सुमारास पिकअप वाहनाने तेलंगणा राज्याकडे रवाना झाले होते. पहाटे सुमारे तीन वाजताच्या सुमारास मंचुरियलजवळ मजुरांनी लघुशंकेसाठी पिकअप रस्त्याच्या कडेला थांबवली. मजूर खाली उतरत असतानाच मागून येणाऱ्या भरधाव हायवा ट्रकचा चालक वाहनावरील नियंत्रण गमावून थेट पिकअपवर आदळला.
या भीषण धडकेत मूल तालुक्यातील चांदली बुज येथील मीनाबाई अनिल लाटेलवार (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान विमलबाई सोयाम (रा. बेबाळ) व लीलाबाई मंडरे (रा. दिघोरी) या दोन महिलांचा मृत्यू झाला. अपघातात विकास टेकाम याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून काही मजुरांची अवस्था चिंताजनक आहे.
जखमी मजुरांना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले असून काहींना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रेफर करण्यात आले आहे. तर काही मजूर तेलंगणा राज्यातच उपचार घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली असून परराज्यात मजुरीसाठी जाणे किती धोकादायक ठरते, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
वृत्त लिहेपर्यंत मृत मजुरांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी तेलंगणा राज्यातच ठेवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. एका अपघाताने तीन कुटुंबांचा आधार हिरावून घेतल्याने गावागावांत हळहळ व्यक्त केली जात आहे.