लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : चामोर्शी–गडचिरोली महामार्गावरील कुनघाडा रै बस थांब्याजवळ १ जानेवारी रोजी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले अतुल तुळशीराम कोसमशिले यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. नागपूर येथे उपचार सुरू असताना आज (७ जानेवारी) त्यांची प्राणज्योत मावळली. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रशासन व पोलिसांच्या भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
१ जानेवारी रोजी कुनघाडा रै येथील रहिवासी अतुल कोसमशिले व संतोष सुधाकर भांडेकर (३८) हे दुचाकीने चामोर्शीच्या दिशेने जात असताना बस थांब्याजवळ चामोर्शीकडून गडचिरोलीकडे सुसाट वेगाने जाणाऱ्या अज्ञात स्कॉर्पिओने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अतुल कोसमशिले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन कानातून रक्तस्राव सुरू झाला, तर संतोष भांडेकर यांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र अतुल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले.
दरम्यान, अपघातग्रस्ताला न्याय व नुकसानभरपाई मिळावी यासाठी २ जानेवारी रोजी चामोर्शी–गडचिरोली मार्गावर नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले होते. आंदोलनस्थळी आमदार डॉ. नरोटे यांनी केवळ आश्वासन देऊन माघार घेतल्याचा आरोप नागरिकांनी केल्याने संताप आणखी वाढला.
स्थानिक नागरिकांच्या मते, बस थांब्याजवळील बिस्वास यांच्या हॉटेलसमोर उभी राहणारी ट्रक व जड वाहने हा कायमचा ‘ब्लाईंड स्पॉट’ ठरत आहे. अस्ताव्यस्त पार्किंगमुळे गावातून महामार्गावर येणाऱ्या वाहनचालकांना मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा अंदाज येत नाही आणि अपघातांची मालिका सुरू आहे. या दुर्घटनेलाही हेच कारण ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आज अतुल कोसमशिले यांच्या मृत्यूने कुटुंबाचा आधारवड हिरावला गेला आहे. अद्याप कोणतीही मदत मिळालेली नसून कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. “जिवंत असताना मदत मिळाली नाही, आता मृत्यूनंतर तरी न्याय मिळणार काय?” असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांवर ठोस कारवाई कधी होणार? की कारवाई केवळ सामान्य नागरिकांच्या वाहनांवरील ‘जास्तीच्या सीट’पुरतीच मर्यादित राहणार? अशी तीव्र चर्चा परिसरात सुरू आहे.














