राज्यस्तरीय ‘उत्कर्ष २०२५-२६’ स्पर्धेत रासेयो विभागाला ‘सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय संघ’ पुरस्कार

132

 गोंडवाना विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ८ : राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उल्लेखनीय कार्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला गेला आहे. दि. ४ ते ७ जानेवारी २०२६ दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (महाराष्ट्र शासन) आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा ‘उत्कर्ष २०२५-२६’ मध्ये गोंडवाना विद्यापीठाला ‘सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय संघ’ म्हणून गौरविण्यात आले.
राज्यातील विविध विद्यापीठांतील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाच्या संघाने शिस्त, संघभावना, वेळेचे काटेकोर पालन आणि सामाजिक जाणीव यांचे प्रभावी दर्शन घडविले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यापीठास प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जतन आणि युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या या राज्यस्तरीय मंचावर मिळालेला हा सन्मान गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सातत्यपूर्ण कार्याची पोचपावती मानला जात आहे. स्पर्धेच्या संपूर्ण कालावधीत स्वयंसेवकांनी दाखविलेली शिस्तबद्ध, जबाबदार व अनुकरणीय भूमिका आयोजक व परीक्षकांच्या विशेष कौतुकास पात्र ठरली.
या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. श्याम खंडारे, संघ व्यवस्थापक प्रा. अंतबोध बोरकर तसेच सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन केले आहे. हा सन्मान विद्यापीठाच्या सामाजिक कार्यातील योगदान अधोरेखित करणारा असून भविष्यातही राज्य व राष्ट्रीय स्तरावर गोंडवाना विद्यापीठाचा नावलौकिक अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे यांनी व्यक्त केला आहे.