वंचितांच्या न्याय-हक्कांसाठी आता सभागृहात लढा : नगरसेवक बाळूभाऊ टेंभुर्णे

157

– सत्कार समारंभात ठाम भूमिका

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ११ :- परिवर्तन पॅनलच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक बाळूभाऊ टेंभुर्णे यांच्या सत्काराचा कार्यक्रम इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात उत्साहात पार पडला. सत्काराला उत्तर देताना नगरसेवक टेंभुर्णे यांनी सामाजिक व राजकीयदृष्ट्या वंचित बहुजनांच्या न्याय-हक्कांची लढाई आता थेट नगर परिषद सभागृहात लढणार असल्याची ठाम भूमिका मांडली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या वनिता बांबोळे होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर दीक्षाभूमी बचाव आंदोलनाचे नेते अभियंता बंडू उर्फ नागवंश नगराळे उपस्थित होते. सत्कारमूर्ती नगरसेवक बाळूभाऊ टेंभुर्णे हे पत्नीसमवेत कार्यक्रमात उपस्थित होते.
यावेळी परिवर्तन पॅनलच्या वतीने नगरसेवक टेंभुर्णे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करताना अभियंता बंडूभाऊ नगराळे म्हणाले की, परिवर्तन पॅनलने गडचिरोली नगरपरिषदेत कौतुकास्पद कामगिरी करत विजय मिळवला आहे. याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीसमोरही परिवर्तनाची संधी असून ‘वन मॅन, वन लीडरशिप’ या तत्त्वावर संपूर्ण आंबेडकरी समाजाने एकजुटीने विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
नगरसेवक बाळूभाऊ टेंभुर्णे म्हणाले की, समाजातीलच काही दुटप्पी लोकांनी मला पराभूत करण्याचे प्रयत्न केले; मात्र कार्यकर्त्यांनी त्यांना योग्य धडा शिकवला. नगरसेवक म्हणून केवळ रस्ते व नाल्यांपुरते मर्यादित न राहता रोजगार, आरोग्य, शिक्षण आदी समाजाच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ गोवर्धन यांनी केले. प्रास्ताविक धर्मानंद मेश्राम यांनी तर आभारप्रदर्शन विश्वरत्न युथ फाउंडेशनचे वृषभ रामटेके यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मानंद मेश्राम, सिद्धार्थ गोवर्धन, जी. के. बारसिंगे, सुखदेव वासनिक, नागसेन खोब्रागडे, ऋषभ रामटेके, प्रतीक डांगे व राहुल मेश्राम यांनी परिश्रम घेतले.