भिंत कोसळून चिमुकलीचा जागीच मृत्यू : महिला गंभीर जखमी

295

भिंत कोसळून चिमुकलीचा जागीच मृत्यू : महिला गंभीर जखमी

लोकवृत्त न्यूज
एटापल्ली :- एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून, घरामागे खेळत असताना शौचालयाची जुनी व जर्जर भिंत कोसळून अवघ्या एक वर्षाच्या लावण्या सुरज पत्रे या चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक महिला गंभीररीत्या जखमी झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ९ जानेवारी रोजी घडली. लावण्या घरामागील परिसरात खेळत असताना, त्याच ठिकाणी असलेली शौचालयाची जुनी व कुजलेली भिंत अचानक कोसळली. क्षणार्धात घडलेल्या या अपघातात लावण्या ढिगाऱ्याखाली दबली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या भीषण अपघातात कल्पना विनोद टेकाम (वय ३०) या महिलाही गंभीर जखमी झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली आल्याने त्यांना मोठी इजा झाली असून, त्यांना तातडीने प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
चिमुकलीच्या अकाली मृत्यूने जारावंडी गावात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी गावातील जुनी, पडकी व धोकादायक बांधकामे तातडीने पाडण्याची मागणी केली असून, अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.