अहेरी हत्याकांडातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या

892

अहेरी हत्याकांडातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या

लोकवृत्त न्यूज
अहेरी दि. २१ :- अहेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या खळबळजनक हत्याकांड प्रकरणात अहेरी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या ४८ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. नागेपल्ली येथील रविंद्र तंगडपल्लीवार यांच्या निर्घृण खून प्रकरणातील फरार आरोपी समय्या मलय्या सुंकरी (वय ३५, रा. मद्दीगुडम, ता. अहेरी) याला अटक करण्यात आली असून, चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
१८ जानेवारी २०२६ रोजी रविंद्र तंगडपल्लीवार (वय ५०, रा. नागेपल्ली) हे आपल्या पत्नीला प्रगती नागरी पतसंस्था, आलापल्ली येथे आरडीचे पैसे भरून येतो, असे सांगून घरातून निघाले होते. मात्र संध्याकाळपर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी अहेरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यांची मिसिंग नोंद करण्यात आली.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी १९ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास आलापल्ली–सिरोंचा महामार्ग क्रमांक ३५३ (सी) वरील नागामाता मंदिराजवळील जंगल परिसरात रविंद्र तंगडपल्लीवार यांचा मृतदेह आढळून आला. धारदार शस्त्राने डोके, मान व चेहऱ्यावर वार करून त्यांचा निर्घृण खून केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तीक मदीरा व उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या सूचनांनुसार विशेष तपास पथक गठीत करण्यात आले. मुखबिरांची माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी समय्या सुंकरी याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली.
आरोपीला २१ जानेवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी (रिमांड) मंजूर करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल एकरे हे करीत आहेत.