_२ ब्रास रेती, पण टिपीत फक्त १ ब्रास! कारवाई की तडजोड?
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २३ : साखरा येथील रेती घाटातून सुरू असलेल्या अवैध्य वाळू तस्करीवर तहसील प्रशासनाने केलेली कारवाई ही कारवाईपेक्षा अधिक संशयास्पद आणि नाट्यमय ठरत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. अवैध्यपणे दोन ब्रास रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकवर जप्तीची कारवाई करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात कारवाईतील कागदपत्रांमध्ये केवळ एका ब्रासचीच टिपी दाखवण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
MH 12 XF 6781 क्रमांकाचा ट्रक साखरा येथील गट क्रमांक ४०८ मधील रेती घाटातून दोन ब्रास अवैध्य वाळू भरून गडचिरोलीकडे येत असतांना, कठाणी नदीजवळ तहसीलदारांनी सकाळच्या सुमारास जप्तीची कारवाई केली. मात्र हे वाहन तहसील कार्यालयात जमा केल्यानंतर तब्बल एक तासाने टिपी सादर करण्यात आली, आणि तीही केवळ एका ब्रास रेतीची. यामुळे ही कारवाई कायद्याची अंमलबजावणी आहे की अवैध रेती तस्करांना दिलेले अभयदान? असा सवाल उपस्थित होत आहे. प्रत्यक्षात वाहनात दोन ब्रास रेती असतांना, एका ब्रासची टिपी कशी काय दाखवण्यात आली?
यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, ज्या साखरा घाटातून ही रेती भरून आली, त्या घाटावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तहसीलदारांची कारवाई फक्त वाहनापुरतीच मर्यादित राहणार की अवैध उत्खनन करणाऱ्या घाटांवरही धडक कारवाई होणार, असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत.
सध्या सुरू असलेल्या अवैध्य रेती तस्करीमुळे नदीपात्रांचे नुकसान, पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासनाच्या महसुलावर मोठा घाला घातला जात आहे. अशा परिस्थितीत, तहसीलदार अवैध रेती तस्करांचे संरक्षक तर बनले नाहीत ना?
प्रशासन आणि तस्करांमध्ये ‘अदृश्य साटेलोटे’ तर नाही ना?
असे खळबळजनक प्रश्न जनतेतून उपस्थित होत असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.














