Home Breaking News लाहेरी शासकीय आश्रमशाळेतील ७० विद्यार्थ्यांना अचानक उलटी-पोटदुखीचा त्रास

लाहेरी शासकीय आश्रमशाळेतील ७० विद्यार्थ्यांना अचानक उलटी-पोटदुखीचा त्रास

345

– रुग्णालयात दाखल

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २८ :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या भामरागड प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारीतील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत मंगळवारी (दि. २७) रात्रीनंतर अचानक तब्बल ७० विद्यार्थ्यांची तब्येत खालावल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ व तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी रात्री जेवण केल्यानंतर एका विद्यार्थ्याला प्रथम पोटदुखीचा त्रास जाणवला. त्यानंतर बुधवारी (दि. २८) सकाळपासून एका मागून एक असे अनेक विद्यार्थ्यांना अशीच लक्षणे दिसू लागली. परिस्थिती गंभीर होत असल्याने आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी तत्काळ विद्यार्थ्यांना लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
सध्या लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० विद्यार्थी, तर भामरागड तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात ३८ विद्यार्थी आणि अहेरी उपजिल्हा रुग्णालयात ०२ विद्यार्थी अशा एकूण ७० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. भामरागड ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी ०१ मुलगा व ०१ मुलगी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहेरी येथे हलविण्यात आल्याची माहिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोषणा चव्हाण यांनी दिली.
लाहेरी शासकीय आश्रमशाळेत एकूण २३० विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची अचानक तब्येत बिघडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी अमर राऊत, तहसीलदार किशोर बागडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोशन चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी रुग्णालय व आश्रमशाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच उर्वरित विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत असून, घटनेच्या कारणांची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशी अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Don`t copy text!