– अजितदादा पवारांना श्रद्धांजली आणि पदग्रहण एकाच दिवशी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.३० जानेवारी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दु:खद निधनानंतर राज्यभर शोककळा पसरलेली असताना आणि शासनाने स्पष्टपणे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करून सर्व सोहळे, कार्यक्रम रद्द केले असतानाही गडचिरोली नगर परिषदेत सत्तेच्या हव्यासाचे निर्लज्ज प्रदर्शन करण्यात आले. दुखवट्याच्या दिवशीच बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर यांनी पदग्रहणाचा सोहळा आयोजित केल्याने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
विशेष म्हणजे, आज नगर परिषद सभागृहात दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आणि त्याचवेळी बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर यांचा स्वतःचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. शोकसभेच्या दिवशीच सत्तेचा जल्लोष करणे हे लोकभावनांचा आणि शासकीय आदेशांचा उघड अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या प्रकाराची माहिती नसताना काही कामानिमित्त नगर परिषद कार्यालयात आलेले नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांना ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ सभापतींच्या कॅबिनमध्ये धडक देत सत्ताधारी पक्षाचा जाहीर निषेध केला. सभापतींच्या कॅबिनमध्येच त्यांनी संतप्त शब्दांत आपली भूमिका मांडत हा प्रकार अशोभनीय, असंवेदनशील आणि सत्तेच्या माजाचे उदाहरण असल्याचे ठणकावून सांगितले.
निषेध करताना टेंभुर्णे म्हणाले, “राज्य शासनाने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. अशा काळात पदग्रहणासारखे सोहळे आयोजित करणे ही सत्ताधाऱ्यांची संवेदनशून्यता दर्शवते. दुखवट्याच्या दिवशी खुर्चीचा सोहळा साजरा करणे हे लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारे कृत्य आहे,” असे म्हणत त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.
या घटनेमुळे नगर परिषदेत खळबळ उडाली असून, शासकीय दुखवट्याच्या काळात पदग्रहण केल्याप्रकरणी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.














