विहिरीत पडलेल्या गायीसाठी तरुणांचे धाडसी रेस्क्यू : अवघ्या १० मिनिटांत जीवदान

269

विहिरीत पडलेल्या गायीसाठी तरुणांचे धाडसी रेस्क्यू : अवघ्या १० मिनिटांत जीवदान

लोकवृत्त न्यूज
धानोरा : धानोरा शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये माणुसकी आणि संघटनशक्तीचे प्रेरणादायी दर्शन घडले. अचानक विहिरीत पडलेल्या गायीला परिसरातील तरुणांनी प्रसंगावधान राखत अवघ्या १० मिनिटांत सुखरूप बाहेर काढून तिचे प्राण वाचविले.
मिळालेल्या माहितीनुसार, करीम अंजनी यांच्या मालकीची गाय अज्ञात कारणाने विहिरीत कोसळली. विशेष म्हणजे या गायीचे वासरू अवघ्या दोन दिवसांचे असून ते विहिरीबाहेर उभे राहून आपल्या आईची वाट पाहत होते. घटनेची माहिती मिळताच सारंग साळवे यांनी तातडीने साजन गुंडावार, संजू कुंडू व सौरव सहारे यांना संपर्क साधला.
केवळ पाच मिनिटांत हे तरुण घटनास्थळी दाखल झाले. कोणतीही साधनसामग्री नसतानाही केवळ जिद्द, धैर्य आणि एकजुटीच्या बळावर त्यांनी अथक प्रयत्न करत गायीला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे परिसरात समाधान आणि आनंदाचे वातावरण पसरले.
या तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनबद्दल सारंग साळवे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, “संघटनातच शक्ती असते” हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे.