– केबिनची तोडफोड; मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
लोकवृत्त न्यूज
यवतमाळ :- शहरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सअॅपवर अश्लील संभाषण केल्याच्या आरोपावरून संतप्त विद्यार्थ्यांनी एका प्राध्यापकाला बेदम चोप दिल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, मारहाणीचे व्हिडीओ समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्राध्यापकाने एका विद्यार्थिनीला सातत्याने व्हॉट्सअॅपवर अश्लील संदेश पाठवून मानसिक त्रास दिला. यासोबतच विद्यार्थिनीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा गंभीर आरोपही विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस येताच विद्यार्थ्यांचा संयम सुटला.
संतप्त विद्यार्थ्यांनी थेट प्राध्यापकाच्या केबिनमध्ये घुसून त्याला जाब विचारला. यावेळी वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाला बेदम चोप दिला तसेच केबिनमधील टेबलच्या काचा फोडून साहित्याची तोडफोड केली. या मारहाणीत संबंधित प्राध्यापक गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे.
घटनेनंतर विद्यार्थ्यांनी संबंधित प्राध्यापकाला तत्काळ निलंबित करण्याची जोरदार मागणी केली. या प्रकारामुळे महाविद्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार पोलिसांत दाखल झालेली नाही. तक्रार प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती लोहारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रोहित जाधव यांनी दिली.














