गडचिरोली : चकमकीत एक माओवादी ठार, जवान जखमी

1748

गडचिरोली : चकमकीत एक माओवादी ठार, जवान जखमी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.५ : नारायणपूर–गडचिरोली जिल्हा सीमेवरील जंगल परिसरात सुरक्षा दल व माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका पुरुष माओवादीला ठार करण्यात आले. या कारवाईत माओवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून घटनास्थळावरून एके-४७ व एसएलआर रायफलसह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी कंपनी क्रमांक १० चे उर्वरित माओवादी सदस्य तसेच छत्तीसगडमधील अज्ञात माओवादी दलमच्या हालचालींबाबत मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांच्या नेतृत्वाखाली मोठे अभियान राबविण्यात आले. त्याच रात्री १४ सी-६० पथकांसह फोदेवाडा गावाच्या काही किलोमीटर अंतरावर, नारायणपूर–गडचिरोली सीमेवर व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली.
काल दिवसा माओवाद्यांशी काही काळ चकमक झाली. या कारवाईदरम्यान माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र, घनदाट जंगलाचा फायदा घेत माओवादी पसार झाले.
आज सकाळी अभियान अधिक तीव्र करत अतिरिक्त ०४ सी-६० पथक व सीआरपीएफ क्यूएटीचे ०१ पथक क्षेत्रात दाखल करण्यात आले. सकाळपासून अधूनमधून चकमकी सुरू असून त्यात एका पुरुष माओवादीचा मृतदेह आढळून आला. मृत माओवादीची ओळख अद्याप पटलेली नाही. आणखी काही माओवादी जखमी किंवा ठार झाल्याची शक्यता असून त्याची पडताळणी सुरू आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी उशिरा माओवाद्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारात सी-६० पथकातील एक जवान गोळी लागून जखमी झाला. जखमी जवानाला तातडीने बाहेर काढून पुढील उपचारासाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर जंगलपरिसरात शोधमोहीम सुरू असून, मोहीम पूर्ण झाल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाकडून सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.